हातकणंगले – तालुक्यातील नागाव येथे बिबट्याच्या पाच दिवसाच्या पिल्लाचा उसाच्या फडाला लावलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. मात्र आता घटनेनंतर बिबट्याच्या पिल्लाच्या आईचा म्हणजेच मादी बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
अमित सोळांकुरे यांच्या उसाच्या शेतातील ऊसतोड मजुरांनी ऊस तोडण्यासाठी मंगळवारी सायंकाळी फड पेटविला. त्यावेळी त्यांना पेटलेल्या उसातून बिबट्या पळताना दिसला. बुधवारी सकाळी पुन्हा ऊस तोडण्यास सुरुवात केली, त्यावेळी ऊसतोड मजुरांना बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे बिबट्याच्या पिल्लाची आई आक्रमक होण्याची शक्यता वन विभाग व शेतकऱ्यांनी वर्तवली होती. त्यामुळे मादी बिबट्या अन्य कोणावर हल्ला करणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला शोधण्यासाठी वन विभागाच्या वतीने बुधवार आणि काल गुरुवारी या परिसरात ड्रोन कॅमेराद्वारे निरीक्षण करण्यात आले. मात्र अद्याप बिबट्याचा मागमूस लागलेला नाही. यापुढे आणखी काही दिवस असाच ड्रोनद्वारे शोध घेतला जाईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.