पेनसिल्वेनिया – जगाची महासत्ता म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या अंड्याचा तुटवडा जाणवतोय. अमेरिकेत अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पेनसिल्वेनिया येथील एका दुकानातून १ लाख अंडी चोरीला गेली आहेत. या अंड्याची किंमत ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३५ लाखांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर जगभरात हा विषय चर्चेला आला असून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या बातमीनुसार ग्रीनकॅसल येथील पेट अँड गॅरी ऑरगॅनिक्समधून १ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती.
पोलिसांनी सांगितले की, पेनसिल्वेनिया येथील दुकानाच्या बाहेर अंडी भरलेला एक ट्रक उभा होता. हा संपूर्ण ट्रकच चोरीला गेला. अमेरिकेत बर्ड फ्लूची साथ वाढल्यामुळे अंड्याची कमतरता भासू लागली आहे. ज्यामुळे अंड्याचे दर गगनाला भिडले आहेत. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेतील वॅफल हाऊस या अंडी विक्रेता साखळीने नुकतेच अंड्याचे दर वाढवले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अंड्याचे दर तब्बल ६५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंड्याचे दर आणखी २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.