नवी दिल्ली – एका २३ वर्षीय महिलेवर बलात्कार व हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या चंद्रभान सानप याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१५ साली त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. चंद्रभान सुदाम सानप याने २०१४ मध्ये तंत्रज्ञान विशेषज्ञ एस्तेर अनुह्या हिचे अपहरण केले व नंतर तिची हत्या करून तिचे शव पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूला जाळून टाकले असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीने ज्या क्रुरतेने हा गुन्हा केला ते पाहाता अशा व्यक्तीचे जिवंत राहणे समाजासाठी धोकादायक असल्याचे म्हणत त्याला मृत्यूदंड सुनावला होता.
त्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा, भूषण गवई व केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने त्याची निर्दोष मुक्तता केली. आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, फिर्यादी पक्षाने यासाठी जी कथा तयार केली त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यातील अनेक गोष्टी या एकमेकांशी जुळत नाहीत. हा तो आरोपी नाही याची आम्हाला खात्री पटल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता केली जात आहे.