मुंबई – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ४९४ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार (विधान परिषद) अनिल भोसले यांची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच जामीनावर मुक्तता केली.
न्या. माधव जामदार यांच्या न्यायासनासमोर भोसले यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. भोसले यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्यास कमाल शिक्षा ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो. मात्र भोसले मागील तीन वर्षे दहा महिने तुरुंगात आहेत. म्हणजे दोषी ठरल्यास जेवढी शिक्षा होईल त्यापैकी अर्ध्याहून अधिक काळ त्यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्याचबरोबर या खटल्याची जलदगतीने सुनावणी होऊन नजिकच्या भविष्यकाळात निकाल लागण्याची शक्यता धुसर असल्याने त्यांना जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद भोसले यांच्या वकिलांनी केला होता. तो ग्राह्य धरून न्यायालयाने भोसले यांना दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी असताना अनिल भोसले यांनी खटल्यातील अन्य आरोपी सुर्याजी पांडुरंग जाधव याच्याशी संगनमत करून १४७.३० कोटी रुपयांचा अपहार केला, असा ईडीचा आरोप आहे. मात्र या खटल्याची नियमित सुनावणी तीन वर्षांनंतरही सुरू झालेली नाही. तसेच सुनावणी नजिकच्या भविष्यकाळात सुरू होण्याची शक्यता नसल्याने भोसले यांची जामिनावर मुक्तता करावी, अशी विनंती त्यांच्या वकिलाने केली होती.