मुंबई- अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणातील आरोपी पकडल्यानंतरही या प्रकरणाचे गूढ कायम आहे. या हल्ल्यात जखमी झालेला सैफ पाच दिवसांनी काल घरी परतला. त्यावेळी शस्त्रक्रिया होऊनही मोटारीपर्यंत आणि नंतर उतरून आरामात चालत जाण्याइतका तो फिट असलेला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी याबाबतच संशय व्यक्त केला. निरुपम यांनी आज सवाल केला की अडीच इंचाचा चाकू मणक्यात घुसला, 6 तासांची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सैफ अवघ्या पाच दिवसांत इतका फिट कसा? तो व्यायाम करतो, तंदुरूस्त होता. तरीही तो इतका ठणठणीत असू शकत नाही. सर्वांना याबाबत प्रश्न पडला आहे. त्यामुळे सैफ कुटुंबाने लोकांना याची माहिती दिली पाहिजे.
अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने चाकूहल्ला केल्यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात जाताना तो रक्तबंबाळ होता असे रिक्षावाल्याने सांगितले. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ अली खान आपल्या घरी परतला. चालत गाडीत जाऊन बसला. गाडीतून उतरून चालत आपल्या इमारतीमध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चोराशी झालेल्या झटापटीत चाकू तुटून त्याच्या पाठीत घुसला आणि उरलेला चाकू घरात पडला होता. पांढरा शर्ट, निळी जिन्स, डोळ्यावर निळा चष्मा, फक्त हाताला बँडेज आणि हसतमुख चेहरा पाहून तो शस्त्रक्रिया होऊन नुकताच रुग्णालयातून परतला आहे यावर विश्वास बसत नव्हता. यावरून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असतानाच निरुपम यांनी आज पत्रकारांसमोर हा मुद्दा उपस्थित करत खुलाशाची मागणी केली.
निरुपम यांनी एक्स पोस्टवर म्हटले की, सैफ अली खानच्या पाठीत अडीच इंचाचा चाकू घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात गेल्यावर पाठीत रुतलेला चाकू काढण्यात आला. सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. पाच दिवसांत उपचार घेऊन सैफ अली खान इतका फिट कसा? रुग्णालयातून तो उड्या मारत बाहेर पडला. वैद्यकशास्त्राने इतकी प्रगती केली? कमाल आहे. मला लिलावती रुग्णालयावर प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. पण त्या रात्री नेमके काय झाले, हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. रुग्णालयात आणताना सैफ अली खानची नेमकी परिस्थिती कशी होती? त्याच्यावर किती काळ शस्त्रक्रिया चालली? हे सर्व जनतेला कळले पाहिजे. 16 जानेवारीच्या रात्री नेमकी काय घटना घडली, यासंदर्भात सैफ अली खान यांच्या कुटुंबियांनी आणि लीलावतीच्या डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज नसण्यावरही निरुपम यांनी बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ते रक्ताने माखलेले होते, असे सांगितले जाते. परंतु त्याचे सीसीटीव्ही चित्रण कुठे आहे? एखादा लहान मुलगा अशा अवस्थेत आपल्या वडिलांना रुग्णालयात घेऊन जाईल का? सैफच्या घरी आठ नोकर होते. या स्थितीत सैफवर हल्ला कसा झाला? याबाबतीत खुलासा झाला पाहिजे. तरच नेमके काय झाले आहे हे लोकांना कळू शकेल. मी सैफ अली खानच्या विरोधात नाही. तो आणि त्याचे कुटुंब सुरक्षित राहायला हवे. परंतु या घटनेचा संपूर्ण मुंबई शहरावर परिणाम झाला. या हल्ल्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला. पोलिसांच्या तपासाबाबतही संशय आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. तिसरा आरोपी हाच खरा आरोपी असून, तो बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचा हा दावा खरा आहे की या प्रकरणात काही मोठे षड्यंत्र आहे ते आपल्याला पाहावे लागेल. संपूर्ण प्रकरण मला गोंधळात टाकणारे आणि संशयास्पद वाटत आहे.
अभिनेता सैफ अली खान आपल्या कुटुंबासह ज्या सद्गुरु शरण या निवासी इमारतीत राहतो, तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलही प्रश्न निर्माण झाले आहेत. या ठिकाणी पुरेसे सुरक्षा कर्मचारी नव्हते. दोन सुरक्षारक्षकांपैकी एक झोपला होता, तर एक अनुपस्थित होता. इमारतीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करणारी नोंदवही नव्हती. या इमारतीत राहणाऱ्यांना त्यांच्याकडे येणाऱ्यांची माहिती देण्यासाठी इंटरकॉमची सोयही नव्हती. सैफ याच्या फ्लॅटबाहेर सीसीटीव्हीही नव्हते. मुंबईतील अतिउच्चभ्रू निवासी इमारतींमध्ये इतक्या त्रुटी कशा काय, असे आता विचारले जात आहे. पोलिसांनी पकडलेला हल्लेखोर शरीफुलबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला संशयित आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शरीफुलच्या चेहरेपट्टीत फरक असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या फोटोची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करून फोटो रेकग्निशन विश्लेषण केल्यावर दोन्ही फोटोंमध्ये खूप तफावत दिसत आहे. कपाळ, नाक, डोळे, ओठ यांचे मोजमाप जुळत नाही. त्यामुळे हे फोटो एकाच व्यक्तीचे नसून वेगवेगळ्या व्यक्तींचे आहेत, असा निष्कर्ष निघत आहे.
दरम्यान, चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालक भजन सिंह राणाची सैफने काल भेट घेतली. या भेटीचे फोटो समाजमध्यमवर व्हायरल झाले आहेत.
सैफने या भेटीत रिक्षाचालकाचे आभार मानले. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोरही उपस्थित होत्या. त्यांनी रिक्षाचालकाबाबत कृतज्ञता व्यक्त करून नेहमी इतरांना मदत करत राहण्यास सांगितले. शिवाय रिक्षाचालकाचे थकीत रिक्षा भाडे देण्याचे आणि त्याला कधीही मदत करण्याचे आश्वासनही सैफने
दिल्याचे कळते.
शस्त्रक्रिया होऊनही सैफ इतका फिट? संशय दूर करा! संजय निरूपमची मागणी
