पुणे – पुण्यात दुर्मिळ गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आतापर्यंत २२ संशयित रुग्णांची नोंद पुणे महापालिकेने केली. आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांच्या माहितीनुसार शहरात ६ व जिल्ह्यातील इतर ठिकाणचे १६ रुग्ण आहेत. तसेच,हा आजार संसर्गजन्य नाही. परंतु ते ज्या रुग्णालयात दाखल आहेत, तिथल्या इतर रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे (आयसीएमआर) या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
दरम्यान, गुईलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ मज्जासंस्थेशी संबंधीत आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन मज्जातंतूवर परिणाम होतो. यामुळे स्नायुंचा कमकुवतपणा, पक्षाघात आणि जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते. हा आजार एक लाखांमध्ये एका व्यक्तीला होतो. हा आजार दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर होण्याची शक्यता असते. यामध्ये अंग दुखणे,चालताना तोल जाणे,चेहरा सूजणे,चालताना व गिळताना त्रास होणे,हात-पाय लुळा पडणे ही लक्षणे आढळतात. यावर उपाय म्हणून ‘प्लाजमा एक्सचेंज केले जाते. तसेच, या आजारावर आयव्हीआयजी हे इंजेक्शन देणे उपायकारक ठरते. हे इंजेक्शन घेतल्यानंतर तीन दिवसात रुग्णांवरील धोका टळतो.