नवी दिल्ली- उत्तर भारतात सध्या थंडीची लाट सुरु असून अनेक राज्यात पारा घसरला आहे. थंडीमुळे दिल्ली परिसरात दाट धुके पसरले असून त्यामुळे ११७ विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला. १० उड्डाणेही रद्द करण्यात आली. दिल्लीला येणाऱ्या रेल्वेवाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याने अनेक रेल्वे विलंबाने धावल्या. उत्तरेच्या १८ राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप जाणवत आहे.
थंडीच्या लाटेने हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंडसह इतर राज्यात जोरदार हिमवृष्टी झाली. हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशात ३ राष्ट्रीय महामार्गांसह २०० रस्ते बंद झालेले आहेत. सिमल्यातील ५६ रस्ते बर्फवृष्टीने बंद झाले असून अनेक वाहने जागोजागी अडकली आहेत. हिमाचल परिवहन विभागाच्या १५ बसही अडकल्या आहेत. या थंड हवेचा परिणाम पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्लीतही जाणवला असून पुढील दोन दिवस तापमानात सतत घट होणार असल्याची त्याचप्रमाणे काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुराच्या अनेक भागात दाट धुके दाटण्याची शक्यता आहे. या थंड हवेचा परिणाम राजस्थान व मध्य प्रदेशातही जाणवणार आहे. हिमाचल, जम्मू काश्मीर व उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी पर्यटक व स्थानिक बर्फात खेळण्याचा आनंद लुटत आहेत. उत्तर भारताबरोबरच तामिळनाडू, पुद्दूचेरी, केरळ मध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.