मुंबई- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर काल महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आज उबाठा गटाने मविआतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले. मविआतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा न करताच उबाठाचे नेते संजय राऊत यांनी मुंबई ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे आपल्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जाहीर केले. राऊत यांच्या या वक्तव्यावर दिवसभर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
गेल्या बुधवारी आणि गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीत विधानसभेत मविआच्या झालेल्या पराभवावर आणि पक्षाच्या पुढील वाटचालीवर विचारमंथन झाले. या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली आणि दुसऱ्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी पराभवाचे खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मविआ फुटीच्या दिशेने चालली असल्याचे स्पष्ट झाले होते. आज संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर करून मविआतील फुटीवर शिक्कामोर्तब झाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्ते पाच- पाच वर्षे पक्षासाठी जीव ओतून काम करतात. त्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यांना डावलल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुका स्वबळावर लढण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले. विधानसभेच्या जागावाटपात विनाकारण विलंब लावण्याचा आरोप काल संजय राऊत यांच्यावर करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली. संजय राऊत जे काही बोलले ती त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकेल. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी नैसर्गिक युती आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील भूमिका ठरवू, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे गटाच्या या भूमिकेबद्दल छेडले असता, त्यांनी निवडणुका एकट्याने लढवायच्या की, आणखी कोणासोबत एकत्र लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे, हे मला माहीत आहे, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या या निर्णयामध्ये फारसे काही वावगे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढण्याचे ठरविले आहे. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. या स्थानिक पातळीवरील निवडणुका आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनादेखील निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असे
गायकवाड म्हणाल्या.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ठाकरे गटाने घेतलेली भूमिका ही मविआमधील फूट असे म्हणता येणार नाही,असे मत मांडले. स्थानिक पातळीवरील निवडणुकांसाठी ती त्या पक्षाची भूमिका असू शकते, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योग्य निर्णय असे म्हणत ठाकरे गटाच्या निर्णयाचे स्वागत केले. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे आणि काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनीदेखील ठाकरे गटाच्या निर्णयात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, अशी भूमिका घेतली.