बदलापूर – बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे प्रतिप्रवासी ५ रुपयांची भाडेवाढ केली आहे. रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी दिसत आहे. याबाबत ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण आरटीओने दिले असून कुणीही जास्त भाडे मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहनही आरटीओकडून करण्यात आले आहे.
शहरी भागात ऑटो रिक्षा प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात करत असतात. काही रिक्षा चालकांकडून नियमानुसार भाडे आकारणी करत प्रवाशांना सोडले जाते, तर काही रिक्षा चालक हे मनमानी पद्धतीने भाडे घेतात. रात्रीच्या वेळी अधिकचे भाडे आकारणी केली जात असते. दरम्यान बदलापूर शहरात शेअर रिक्षाचे किमान भाडे हे आतापर्यंत १५ रुपये होते. आता यात पाच रुपयांची वाढ करून थेट २० रुपये करण्यात आले आहेत. रिक्षा चालकांनी केलेल्या भाडेवाढी संदर्भात आरटीओकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,याबाबत बदलापूर पूर्वेकडील रिक्षा चालक- मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख म्हणाले की, दोन महिन्यांपूर्वी रिक्षा प्रवासी भाडे २० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट साडेतीन किमीपर्यंतच्या अंतरासाठी ही दरवाढ असून नियमानुसार रिक्षात तीन प्रवाशांचीच वाहतूक केली जात आहे.