बार्शी – तालुक्यातील वैराग परिसरात अनेक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. या वाघाने वैराग परिसरातील आपला मुक्काम आणखी वाढवला असून सलग तीन दिवस तीन जनावरांवर हल्ला केला आहे.पहिल्या दिवशी मुंगशी परिसरात त्याने दोन जनावरांवर हल्ला केला होता. त्यानंतर सासुरे व शेळगाव हद्दीत हल्ल्यात दोन वासरांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. तर काल सकाळी वैराग येथील लाडोळे तळ्याजवळ विनायक खेंदाड यांच्या बैलावर जीवघेणा हल्ला करून त्याचा एक पाय खाल्ला.
वैराग परिसरात वाघाने हल्ला केल्याच्या तीन घटना घडूनही वनविभाग याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. त्यामुळे वनविभाग वाघ माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.तीनपैकी दोन घटना रात्रीच्या घडल्याने शेतकरी रात्री शेताकडे जात नव्हते.परंतु काल सकाळी अचानक वैराग येथील लाडोळे तळ्याजवळ विनायक महिपती खेंदाड यांच्या बैलावर जिवघेणा हल्ला करून एक पाय खाऊन त्याला जखमी केले. त्याठिकाणी वनविभागाचे अधिकारी धनंजय शिदोडकर व सचिन पुरी यांनी तत्काळ भेट दिली व तेथील ठशांवरून हे कृत्य वाघानेच केले असल्याचे सांगितले.त्यामुळे दिवसांही शेतकरी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.