सागरी किनारा महामार्गावरील जाहिरात फलकांना परवानगी

मुंबई – मुंबईच्या किनाऱ्यालगत असलेल्या सागरी महामार्गावर म्हणजेच कोस्टल रोडवरील जाहिरात फलकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्य किनारा व्यवस्थापन महामंडळाने मुंबई महानगर पालिकेच्या या संदर्भातील प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.किनारा महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कोस्टल रोडवरील टाटा गार्डन, एमेझॉन गार्डन आणि लाला लजपतराय उद्यानाजवळ हे जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली असून एका खांबावर हे फलक उभारण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महामंडळाने यासाठी काही अटीही घातल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,सीआरझेड च्या नियमांच्या आधीन राहून केवळ जमिनीच्या बाजूला हे फलक उभारण्यात यावेत. ना विकास क्षेत्रात फलक उभारले जाणार नाहीत याची दक्षता महापालिकेने घ्यावी. सीआरझेड २ क्षेत्रात हे फलक उभारु नयेत. महापालिकेने फलकांची मजबूती व स्थिरता याची खात्री करुन घ्यावी.या फलकांच्या माध्यमातून पालिकेला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता असून हाजी अली येथील फलकाच्या माध्यमातून महिन्याला २७ ते ३० तर टाटा गार्डन जवळच्या फलकातून महिन्याला ४४ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेने म्हटले आहे की, या फलकांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यातील सर्व अटी व शर्तींचे कठोरपणे पालन करण्यात येईल. ज्या कंपनीला हे कंत्राट मिळेल त्यांच्यावरच सागरी किनारा महामंडळाची परवानगी घेण्याची जबाबदारी असून परवानगी शिवाय फलकाच्या उभारणीला परवानगी दिली जाणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top