मुंबई – यंदाच्या माघी गणेशोत्सवात पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.तसेच ‘आम्ही पीओपी’ ची गणेशमूर्ती आणणार नाही, असे लेखी हमीपत्र माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना द्यावे लागणार आहे.घरगुती गणेशमूर्तीही यंदा पर्यावरणपूरकच असावी असेही निर्बंध घालण्यात आले आहेत.
यंदाची माघी गणेशजयंती १ फेब्रुवारी रोजी आहे.गेल्या काही वर्षांपासून अनेक सार्वजनिक मंडळे माघी गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा करू लागली आहेत. मात्र यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक करण्यासाठी पालिकेने यावेळी प्लॅस्टर ऑप पॅरिसच्या मूर्तींना १०० टक्के बंदी राहणार असल्याचे जाहीर केले आहे.याबाबत पालिकेने काल सोमवारी नियमांचे परिपत्रकच जारी केले आहे. त्यामुळे पीओपीपासून बनवलेली मूर्ती स्थापन करणार नाही असे हमीपत्र मंडळांना पालिकेकडे सादर करावे लागणार आहे.तसेच
रस्त्यावर व पदपथांवर मंडप मंडप परवानगीसाठी प्रशाकीय विभाग कार्यालयातील संबंधित कर्मचारी,अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांकरिता मार्गदर्शक सूचना, नियम लागू करण्यात आले आहेत. माघी गणेशोत्सवासाठी एकखिडकी पद्धतीने ऑफलाइन परवानगी देण्यात येणार आहे. तसेच मंडळांकडून उत्सवासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने येणाऱ्या अर्जांची विभाग कार्यालयाकडून छाननी करून वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे.