मुंबई- मागील काही दिवसांत मुंबई महापालिका क्षेत्रात थंडीबरोबर प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात चिकनगुनिया आणि न्युमोनिया आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तर तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईत ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. हे बांधकाम सुरू असताना होणारे प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू लागले आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यास पालिका प्रशासन कमी पडत असल्यानेच या आजारात दिवसेंदिवस वाढ होते असा आरोप केला जात आहे. राज्य आरोग्य विभागाच्या जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईत सर्वाधिक चिकुनगुनियाचे रुग्ण आहेत. पालिका रुग्णालयात १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत तब्बल ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२३ च्या तुलनेत यावर्षी सुमारे २९५ टक्के अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामचुकारपणामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत दररोज सरासरी दोन रुग्णांना या आजारामुळे नाहक जीवाला मुकावे लागत आहे, असे मत राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.