पोलीस ठाण्यात पलंग मागवला! वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट?

बीड – बीड येथील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मिक कराड याची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे. ही चौकशी जिथे सुरू आहे, त्या बीडच्या शहर पोलीस ठाण्यात काल अचानक पाच पलंग मागवण्यात आले. पोलीस ठाण्याबाहेर ठेवलेल्या या पलंगातील एक पलंग आज पोलीस ठाण्याच्या आत नेण्यात आला. तो वाल्मिक कराडसाठी वापरण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. वाल्मिक कराडची चौकशी चालू असतानाच नेमके हे पलंग मागवल्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडला चौकशीसाठी बीडला आणण्यात आले आहे. त्याची गेले दोन दिवस बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. ती सुरू असतानाच पोलीस ठाण्यात अचानक पाच पलंग आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या बाहेरच हे पलंग ठेवले होते. वाल्मिक कराडची चौकशी सुरू असतानाच हे पलंग मागवण्यात आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेतले. त्यावरून सगळीकडे चर्चा सुरू झाली. बीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना पत्रकारांनी यावरून प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, बीड शहर पोलीस ठाणे नव्याने बांधण्यात आले आहे. आम्ही दीड महिन्यांपूर्वी नव्या पोलीस ठाण्यात आलो आहोत. या ठिकाणी अंमलदार आणि अधिकार्‍यांसाठी असलेल्या सुविधा पुरवण्याचे काम अजून सुरू आहे. पोलीस ठाण्यातील आरोपींसाठी गार्ड तैनात केलेले आहेत.
हे गार्ड 24 तास पोलीस ठाण्यात असतात. त्यांना आराम मिळणे गरजेचे असते. पोलीस ठाण्यात रेस्टरूम आहे, पण त्याठिकाणी झोपण्यासाठी पलंग नाहीत. आमच्यासाठी बेडची सोय करावी, अशी मागणी गार्डकडून करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांच्या गरजा पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. मी प्रभारी अधिकार्‍यांना पलंग आणायला सांगितले होते. त्यानुसार पोलीस मुख्यालयातून ते आणण्यात आले आहेत. हे पलंग वाल्मिक कराडला येथे आणल्यानंतरच आणण्यात आले, हा निव्वळ
योगायोग आहे.
पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला फक्त एक पलंग आत नेण्यात आला. उर्वरित 4 पलंग बाहेर का ठेवण्यात आले, असे विचारले असता पांडकर म्हणाले की, तो पलंग महिला अंमलदाराच्या खोलीत नेण्यात आला आहे. आमचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर काही टाकण्यापूर्वी ते खरे आहे की नाही, हे तपासा. तुमच्याकडे कुठलीही माहिती आली तर वरिष्ठांना विचारून खातरजमा करा.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ही माहिती देत असतानाच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावरून प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी वेगळेच सांगितले. ते म्हणाले की. वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी सध्या बीडमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक पाठवण्यात आली आहे. त्यांना काय जमिनीवर झोपवायचे का? तर वाल्मिक कराड ज्यांचा कार्यकर्ता आहे, ते अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, हे पलंग पूर्वीच मागवलेले आहेत. घटना घडल्यावर किंवा आरोपीला आणल्यावर इथे आणलेले नाहीत. पोलिसांनी ते स्वतःसाठी मागवले आहेत. याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार मात्र याबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले की, वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग तर चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टीव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण असे सगळेच मिळेल. वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे की नाही? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या दहशतीत ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने वाल्मिक कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. वाल्मिक कराडवर अद्यापही संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य पद्धतीने तपास करावा, आरोपीचे लाड पुरवू नयेत.
सीआयडी कस्टडीमध्ये असलेल्या याची तब्येत बिघडल्याचेही सांगण्यात येत आहे. वाल्मिक कराड याला पहिल्या दिवशी थोडावेळ ऑक्सिजन मास्क लावावा लागला. यानंतर आता दुसर्‍या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन मास्क लावला. कराड याला दररोज गोळ्या सुरू आहेत. सीआयडीकडे शरण येताना त्याने सोबत औषधे आणली आहेत. सीआयडी कस्टडीमध्ये डॉक्टरांनी कराड याची तपासणीही केली आहे. कराडने सीआयडी कोठडीत पहिल्या दिवशी जेवण घ्यायला नकार दिला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने नाश्ता घ्यायला नकार दिला. कराड याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. अधिकार्‍यांनी कराडला खाण्याचा आग्रह केल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास जेवण केले. वाल्मिक कराड याने अधिकार्‍यांकडे काही मागण्या केल्या आहे. त्याने भात किंवा खिचडीची मागणी केली आहे. त्याने पलंगाची मागणी केली आहे का, याची माहिती मात्र मिळाली नाही.

एसआयटीचाही तपास सुरू
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी काल विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली. या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या पथकाचे नेतृत्व आहे. या पथकात बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपमहानिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुट्टे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे. या पथकाने आज केजमध्ये पोहोचून तपास सुरू केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top