पाटण – तालुक्यातील वन हद्दीच्या भागात वणवे लागू नयेत आणि वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणुन वनविभागाने रात्रीची गस्त घालायला सुरुवात केली आहे.तसेच परिसरातील गावात जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
जंगल भागात असलेल्या तालुक्यातील बहुले, बोडकेवाडी,गणेवाडी,ठोमसे आणि उरुल आदी गावांमध्ये वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच पाटण वनविभाग आणि मल्हारपेठ वन परिमंडलाच्यावतीने निर्जन स्थळी रात्रगस्त घालण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा वनसंरक्षक अदिती भारद्वाज,सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजूर्णे तसेच पाटण वनक्षेत्रपाल राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीद्वारे रात्रगस्त घालण्याचे हे अभियान राबवले जात आहे. डोंगर आणि शेतशिवारात रंगीत संगीत मेजवानी करण्याचे फॅड वाढत चालले आहे. अशावेळी मद्यधुंद तरुणांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिसांसह वनविभाग दक्ष झाला आहे.