पुणे – कोरेगाव भीमा लढाईचा आज २०७ व्या वर्धापन दिन साजरा झाला. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून लाखो अनुयायी दाखल झाले होते. ७५ फुटी ऐतिहासिक विजयस्तंभाला ५० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांची सजावट करण्यात आली होती. या विजयस्तंभावर अशोकचक्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे तैलचित्र होते . या ठिकाणी पाच हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले होते . केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांनी विजयस्तंभास अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून स्मारकासाठी २०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी मी करणार आहे. लाखोंच्या संख्येने लोक येत असल्याने १०० ते २०० एकर जमीन देखील शासनाने द्यावी अशी मागणी करणार असे यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार आपल्या पद्धतीने सुविधा पुरवत असते, पण या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पुढच्या वेळेस आणखी सुविधा पुरवल्या जातील. समाजातील विषमता अणि अमानुषता याविरोधात चळवळ सुरू राहिली पाहिजे.