सोलापूर – अक्कलकोट तालुक्यात मैंदर्गीजवळ भीषण अपघाताची घटना घडली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या अपघातात २ महिला व २ पुरुष या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर तत्काळ अक्कलकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. तर, जखमींवर उपचार सुरू असून, पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जाताना स्कॉर्पिओ कार आणि मैंदर्गीजवळ समोरून येणारा आयशर ट्रकची एकमेकांना धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला. तर आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून पडला होता. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत व जखमी भाविक हे नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.