चेन्नई – तामिळनाडूत काल देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, राज्याचे मंत्री आणि खासदार कनिमोळी उपस्थित होते. त्यांनी उद्घाटनानंतर पुलावर फेरफटका मारला.याप्रसंगी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्यावर लेझर लाईट शोचे आयोजन केले होते.
कन्याकुमारीच्या काठावर ७७ मीटर लांब आणि १० मीटर रुंद असे या पुलाचे बांधकाम झाले आहे.या पुलाच्या बांधकामामुळे पर्यटकांना कन्याकुमारीच्या काठावरील विवेकानंद रॉक मेमोरियल येथून थेट १३३ फूट उंच तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत जाता येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. यावेळी कन्याकुमारीचे पर्यटन अधिकारी म्हणाले की, काचेच्या पुलाखाली समुद्र आहे. त्यामुळे पुलावरून चालताना आपण समुद्रावर चालत आहोत अशी अनुभूती येते. या कमानदार पुलाची निर्मिती किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याला तोंड देण्यासाठी केली आहे.