बीडप्रमाणे तुळजापुरात हल्ला! सरपंचाला जाळण्याचा प्रयत्न

धाराशीव- बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली असतानाच तुळजापूर जिल्ह्यातील मेसाई जवळगा या गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही गावात सरपंचाने पवनचक्कीच्या कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर हल्ला झाला. ही गंभीर बाब आहे.
काल रात्री तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात सरपंच निकम थोडक्यात वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी चार अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निकम यांच्यावरील हा हल्लाही पवनचक्कीच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पवनचक्कीच्या व्यवहारातून महाराष्ट्रात भयंकर खुनशी हल्ले सुरू झाल्याचे चित्र असून, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम रात्री एक वाजताच्या सुमारास बारुळ गावातून त्यांच्या गावच्या दिशेने गाडीने प्रवास करत होते. गाडीत त्यांचा भाऊदेखील होता. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन दुचाकी आल्या. दुचाकीस्वार हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे, असे समजून निकम यांनी गाडीचा वेग कमी केला. त्यानंतर दुचाकीस्वारांनी गाडीच्या डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली. त्यामुळे निकम यांनी गाडीचा वेग वाढवला. तेव्हा दुचाकीवरील गुंडांनी गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला असता हल्लेखोरांनी पेट्रोलचे फुगे गाडीत टाकून माचिसने गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांना त्यात यश न आल्याने निकम थोडक्यात वाचले.
बीडनंतर तुळजापूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सरपंच निकम यांनी सांगितले की, काल बारुळला वीज गेली होती. ती बराच वेळ न आल्याने मी वीज कर्मचाऱ्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले. त्यानंतर मी तिथे पाहणी करण्यासाठी गेलो. तिथून परतत असताना हा प्रकार घडला. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा माझा संशय आहे. या गावात रिन्यू कंपनीचे पवनचक्कीचे काम चालू आहे. मागील महिन्यात इथल्या शेतकऱ्यांची मिटिंग झाली होती. मी त्या मिटींगला उपस्थित होतो. त्यावेळी मला एक फोन आला. त्यावरून माहिती मिळाली की, काही लोक शेतकऱ्यांना दमदाटी करत होते. ग्रामपंचायतीची पाईपलाईन फोडल्याने वाद सुरू होता. ही पाईपलाईन नवीन होती.ती फोडल्याने आता बंदच आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या भाड्याच्या पैशावरूनही वाद होता. मी त्यावेळी शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांना विचारले की, तुमचा काय संबंध? तुम्ही शेतकऱ्यांना दमदाटी का करता? तुमच्याकडे कंपनीचे ओळखपत्र आहे का? त्यावेळी त्यांनी आमच्याकडे ओळखपत्र नाही, असे सांगितले. मी त्यांना मग तुम्ही कंपनीचे कर्मचारी कसे, वेळेवर शेतकऱ्यांना पैसे दिले तर काही वाद होणारच नाही, असे म्हटले. या वादातूनच माझ्यावर हा हल्ला झाला असावा.
तुळजापूर पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत सांगितले की, आम्ही याचा सर्व दृष्टीने तपास करत आहोत. धाराशिव जिल्ह्यात कुठलीही गुंडगिरी चालणार नाही. सरपंच निकम यांनी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
पवनचक्की कंपन्या व त्यांच्या दलालांकडून शेतकऱ्यांना दमदाटी व फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पवनचक्की कंपन्या दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर दहशत गाजवत आहे. त्यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. बीड, धाराशिवसारख्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर बांध फोडणे, वृक्षतोड करणे, पिकातून वाहने घालणे, भाडोत्री गुंडांमार्फत धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. याच्या तक्रारी करूनही पोलीस दखल घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात खंडणीचे प्रकार घडत असून त्यातून आता हल्ले सुरू झाले आहेत.
पागोटे गावातही दहशत
उरण तालुक्यातील पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी पोलिसांकडे गावगुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गावगुंडांनी माझ्यावर हल्ला केला होता. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही कारवाई केलेली नाही. माझा देशमुख होण्याची वाट पाहात आहात का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. धाराशीवच्या बारूळ गावात सचिन ठोंबरे यांना पवनचक्कीच्या वादातून रॉडने मारहाण झाली. त्याबाबत तेही न्याय मागत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top