साना (येमेन) – जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस काल येमेन साना आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या बॉम्बहल्ल्यातून थोडक्यात बचावले. या बॉम्बहल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर विमानतळावरील एक विमान कर्मचारी जखमी झाला.
संयुक्त राष्ट्रांच्या आणि जागतिक आरोग्य संघटनेतील काही सहकाऱ्यांसोबत साना विमानतळावर आले होते. काही वेळातच ते सर्व जण विमानात चढणार होते. मात्र त्यापूर्वीच बॉम्बहल्ला झाला. या घटनेची माहिती घेब्रेयेसस यांनी आपल्या अधिकृत एक्स समाज माध्यमावर शेअर केली.
येमेनमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांची सुटकेसंबंधी बोलणी करण्यासाठी आणि तेथील बिकट आरोग्यविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही येमेन दौऱ्यावर आलो होतो.काल आमचा दौरा आटोपल्याने आम्ही माघारी परतत होतो. आम्ही प्रतीक्षा कक्षात बसलो होतो. तेवढ्यात अवघ्या काही मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला. आमच्या विमानांपैकी एका विमानाचा कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाला. तर विमानतळावरील दोन प्रवासी मारले गेल्याचे कळते, असे घेब्रेयेसस यांनी एक्स पोस्टवर लिहिले.