नवी दिल्ली – भारतातील आर्थिक सुधारणांचे नायक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, राजकीय क्षेत्रात राहूनही राजकारणी नसलेले अजातशत्रू भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयात श्वसनाच्या आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,3 मुले असा मोठा परिवार आहे. 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात ते या देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मनमोहन सिंग यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते. आज रात्री 7.45 च्या सुमारास त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना 8 वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण त्यांना वाचवू शकले नाहीत. 9.51 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगाव येथून काँग्रेसची बैठक सोडून राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीकडे धाव घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांची एम्समध्ये रीघ लागली आणि त्यांनी मनमोहनसिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी अनुक्रमे 1952 आणि 1954 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रिपो (विशेष पदवी)पूर्ण केले. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले. डॉ. सिंग पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवायला गेले. ते 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यांनी अनेकदा या पदावर काम केले. युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली. इंदिरा गांधींपासून त्यांनी तब्बल सात पंतप्रधानांसोबत काम केले.
सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती ढासळलेली होती. परंतु सिंग यांनी मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार करून जगाला भारताची अर्थव्यवस्था खुली केली. देशात उदारमतवादाचे वारे वाहू लागले. अर्थव्यवस्थेची गाडीही रुळावर आली. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा पाया त्यांनी उभारला.
डॉ. सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य राहिले. राज्यसभेत ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि दुसर्या कार्यकाळात पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. ते शीख समाजाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत देशाचा विकासदर सर्वाधिक सात ते आठ टक्के राहिला. त्यांच्याच काळात अमेरिकेबरोबर अणुकरार झाला. मात्र विशेषतः दुसर्या कार्यकाळात अनेक घोटाळ्यांचे खापरही त्यांच्यावर फोडण्यात आले. ते पंतप्रधान असताना सोनिया गांधी यांच्या हातात रिमोट कंट्रोल राहिल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. त्यांच्या जीवनावर ‘अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ नावाचा चित्रपटही निघाला होता.