मणिपूरच्या राज्यपालपदावर अजय कुमार भल्लांची नियुक्ती

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. काल मंगळवारी मणिपूरसह केरळ तसेच बिहारमध्ये नवे राज्यपाल नेमण्यात आले. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.

सर्वाधिक काळ गृहसचिव राहिलेल्या भल्ला यांच्यावर मणिपूर जबाबदारी देण्यात आली आहे. मे २०२३ पासून वांशिक संघर्ष सुरू असताना तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याबद्दल गृह विभागावर टीकाही झाली होती.असे असताना आता याच काळात गृहसचिव असलेल्या भल्लांना मणिपूरचे राज्यपालपद देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.ओडिशात दास यांच्या जागी मिझोरामचे राज्यपाल हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली, तर केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहारचे राज्यपालपद सोपवण्यात आले आहे. राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात खान यांचा संघर्ष सुरू आहे. यापूर्वीचे बिहारचे राज्यपाल असलेले राजेंद्र आर्लेकर यांच्यावर केरळची जबाबदारी असेल. तर मिझोरामच्या राज्यपालपदी माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांना नेमण्यात आले. नवे राज्यपाल पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती असेल असे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top