प्रयागराज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून सुरु होणाऱ्या महाकुंभ कलशाची स्थापना केली. अष्टधातूपासून बनवलेला हा कलश पुराण कथांमध्ये वर्णन केलेल्या अमृतकुंभाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पंतप्रधान मोदी प्रयागराज येथे अराइल घाटातून निषादराज क्रूझमध्ये बसून संगम किनाऱ्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी उपस्थित होते. त्यानंतर संगमावर 30 मिनिटे गंगापूजन करून, गंगेला वस्त्र व दूध अर्पण केले. तसेच पंतप्रधानांनी अक्षयत्वाची प्रदक्षिणा केली व हनुमानाची आरती करून त्यांच्या हस्ते अन्नदान केले. त्यानंतर त्यांनी सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढला.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 3 तासांच्या प्रयाग दौऱ्यात 5,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. संगमावर पूजा करून महाकुंभ तयारीचा आढावा घेतला.तर जवळपास 167 प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यासह विश्वाला महाकुंभ सोहळ्याचे निमंत्रण दिले. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी चार मोठ्या कॉरिडॉरचे उद्घाटन केले. यामध्ये भारद्वाज आश्रम कॉरिडॉर, शृंगवरपूर धाम कॉरिडॉर, अक्षयवत कॉरिडॉर आणि हनुमान मंदिर कॉरिडॉरचा समावेश आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला उद्देशून म्हणाले की, महाकुंभ केवळ सामाजिक शक्ती प्रदान नव्हे तर लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करणार आहे. हा कुंभ कोणत्याही बाह्य व्यवस्थेपेक्षा माणसाच्या अंतर्मनाच्या जाणिवेचे नाव आहे. ही जाणीव आपोआप जागृत होते. हीच जाणीव भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या काठावर खेचून आणते. त्यामुळे हा महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ आहे. ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या भेदभावाची आहुती दिली जाते.