पालघर- पालघरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात नागरिकांना शाळेतील जुना दाखला मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण शाळांमधील जुने अभिलेख पुसट आणि जीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठीही हे शालेय दाखले देणे डोकेदुखी ठरत आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा १९४७ नंतर अस्तित्वात आल्या आहेत. त्या काळात टाक, दौत आणि शाईच्या पेनाचा वापर केला जात होता. मात्र या शाईच्या पेनाचा वापर केलेले सर्व अभिलेख पुसट झाले आहेत. तर काही पाने व वाळवी लागल्याने जीर्ण झाली आहेत. त्यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. बसप्रवास सवलत आणि जातीचा दाखला काढण्यासाठी या आदिवासी बांधवांना शाळा सोडल्याचे दाखले मिळत नसल्याने हा लाभ मिळत नाही. यासाठी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जुन्या अभिलेखांचे जतन व संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.