नवी दिल्ली- आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर मोठी भेट दिली आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना अदानी यांनी येत्या काही दिवसांत अमेरिकेत १० अब्ज डॉलर म्हणजेच ८४ हजार कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
गौतम अदानी यांनी बुधवारी अमेरिकेत ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.या माध्यमातून १५ हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही अदानी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.मात्र,अदानी यांनी आपला पोर्ट- टु- एनर्जी समुह अमेरिकेत कोणत्या प्रकल्पात ही गुंतवणूक करणार आणि त्यासाठी किती कालावधी लागणार याचा तपशील दिलेला नाही.