क्वेट्टा – पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम बलुचिस्तान भागातील क्वेट्टा रेल्वे स्थानकात आज सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जण ठार झाले असून ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १४ सैनिकांचाही समावेश आहे. या स्फोटाची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने स्लीकारली आहे. हा आत्मघाती हल्ला असून हल्ल्याचे लक्ष्य येथील पाकिस्तानी सैनिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जखमींना क्वेट्टाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
क्वेट्टा रेल्वेस्थानकावर आज सकाळी ९ वाजता एका फलाटावर हा स्फोट झाला, तेव्हा या फलाटावरुन क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस रवाना होणार होती. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी होती. यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील अनेक सैनिकही होते. प्रवासी रेल्वेची वाट पाहात असताना अचानक हा स्फोट झाला. त्यानंतर फलाटावर एकच गोंधळ उडाला. स्फोटानंतर तातडीने मदतकार्य सुरु केले गेले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही आपात्कालीन स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कामावरून घरी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही परत बोलावण्यात आले. अनेक जखमींची स्थिती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. या स्फोटात फलाटाचे छत उद्धवस्त झाले. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हल्ला घडवणाऱ्यांना सोडणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी तातडीने एक उच्चस्तरीय बैठक बोलावत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.