कॅनडातील मंदिरात भक्तांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला

टोरांटो – खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन दिले जात असल्याने भारत व कॅनडातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच काल ब्रॅम्पटन येथील एका मंदिरावर खलिस्तान समर्थक गटाने मंदिरात घुसून हल्ला केला. यावेळी मंदिरात जमलेल्या लोकांना त्यांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा कॅनडाचे पंतप्रधान व इतरांनी तीव्र शब्दात निषेध केला असला तरी या घटनेने खळबळ माजली आहे. कॅनडात पुढील वर्षी निवडणुका आहेत. अशावेळी पंतप्रधान ट्रुडो यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यामुळे भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊन ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
ब्रॅम्पटन येथील हा हल्ला केवळ हिंदू भाविकांवर झालेला नाही. या मंदिरात भारतीय दुतावासाने ज्येष्ठ भारतीय नागरिकांना आवश्यक असलेले जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी कॅम्प लावला होता. त्यासाठी मंदिरात गर्दी होती. प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या भारतीय नागरिकांवर हा हल्ला करण्यात आला. भारतीय दूतावासाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की, या कार्यक्रमावर झालेला हा हल्ला दुर्दैवी आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी भारतीय दूतावासाने ओटावा, व्हॅनकुव्हर व टोरांटोमध्ये स्थानिकांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी

एका शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी स्थानिक प्रशासनालाही कळवण्यात आले होते. त्यांनीही सुरक्षा पुरवली होती. जीवन प्रमाणपत्रांचे वाटप हे एक नियमित काम असून, त्याच्या शिबिराची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. 3 नोव्हेंबर रोजी हे शिबीर सुरू असताना काही भारतविरोधी गटानी या शिबिरावर हल्ला केला. हे शिबीर टोरांटो जवळील ब्रॅम्पटन येथील एका हिंदू मंदिरात आयोजित करण्यात आले होते. या हल्ल्यानंतरही नियोजित सर्व म्हणजे 1 हजार प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अशाच प्रकारचे हल्ले व्हॅनकुव्हर व सुरे या ठिकाणीही करण्यात आले. भारतीय दूतावासातील कर्मचारी व अधिकारी यांना येत असलेल्या विविध धमक्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सुरक्षा पुरवावी. या पुढील शिबिरांमध्येही अशा प्रकारचा गोंधळ झाल्यास पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांना जीवन प्रमाणपत्रे देण्यात येईल.
दरम्यान हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या खलिस्तान समर्थक सिख फॉर जस्टिस या संघटनेने म्हटले आहे की, आम्ही भारतीय उच्चायुक्तांनी मंदिरात येऊन दर्शन घेण्याला विरोध करण्यासाठी एकत्र आलो होतो. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्यात आला नाही. मात्र या हल्ल्याचे जे व्हिडिओ प्रसारित होत आहेत त्यात खलिस्तानी समर्थक आपल्या हातातील पिवळ्या झेंड्याच्या काठीने काही लोकांना मारहाण करत असल्याचे
दिसत आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ब्रॅम्पटन येथील हिंदू सभा मंदिरात झालेला हिंसाचार स्विकारता येणार नाही. प्रत्येक कॅनडियन नागरिकाला मुक्त व सुरक्षितपणे त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे.
ब्रॅम्पटनचे महापौर म्हणाले की, कॅनडात धार्मिक स्वातंत्र्य हे मूलभूत आहे. प्रत्येकाला आपापल्या प्रार्थनास्थळी सुरक्षित वाटले पाहिजे. या प्रार्थनास्थळावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. नेपियनचे खासदार चंद्र आर्य यांनीही तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. अतिरेक्यांनी सर्वच सीमा ओलांडल्या आहेत. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. टोरांटोचे खासदार केविन वुओंग, हिंदू कॅनेडिअन फाऊंडेशन यांनीही या हल्ल्याचा निषेध
केला आहे.
दरम्यान, या घटनेचा निषेध करत अमेरिकी संसदेचे सदस्य ठाणेदार यांनी कॅनडा सरकारवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी अमेरिकेत हिंदू संघटनेची स्थापना केली आहे. अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर होणार्‍या हल्ल्यांच्या बाबतीत मी अमेरिकेच्या गृह विभागाशी अनेक वेळा बोललो आहे. आता कॅनडातील सरकार या प्रकारावर राजकारण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top