मुंबई- वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीएसएमटी ते गोरखपूर अशी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.मात्र,अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गाडीची माहिती प्रवाशांपर्यंत योग्य वेळेत पोहोचलीच नाही. त्यामुळे या गाडीचे तब्बल १२ डबे रिकामेच नेण्याची नामुष्की रेल्वेवर ओढवली.
या विशेष अनारक्षित १५ डब्यांच्या गाडीमधील केवळ तीन डबे प्रवाशांनी भरले होते.उर्वरित ट्रेन जवळपास रिकामीच राहिल्याचे स्पष्ट झाले.तसेच रेल्वेने या अनारक्षित गाडीसाठी प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी सीएसएमटीवर मोठा फौजफाटा तैनात केला होता.रेल्वेने घाईगडबडीत ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतानाच प्रवाशांना याबाबत पुरेशी माहिती दिली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली,असे म्हटले जात आहे.