मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनलेली चिपी-मुंबई विमानसेवा ऐन दिवाळी आणि निवडणूक काळात बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत उद्या शनिवार २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ आॅक्टोबरला बंद होणार आहे.
तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ९ ऑक्टोबर २०२१ पासून सिंधुदुर्गातील ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु झाली होती.हे विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरली होते.चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसादही मिळत होता.मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती.त्याची मुदत उद्या शनिवार २६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र,आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे.त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.