मुंबई – भातसा धरण प्रकल्पात बाधित झालेल्या २८ प्रकल्प बाधितांना मुंबई महापालिकेकडून रोजगार देण्यासाठी त्यांना मुंबई महापालिकाच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वात सुधारण करण्यात आली आहे. त्यानुसार आता प्रकल्पबाधित व्यक्तीचा खापर पणतू, त्याची पत्नी किंवा खापर पणती यांनाही महापालिका सेवेत नोकरी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या महसूल आणि वन खात्याद्वारे प्रकल्पबाधित व्यक्तींना भरपाई अथवा नोकरी सेवा लाभ देण्याबाबत सुधारित धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांची यापुढे मुंबई महापालिका स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.यापूर्वी,पाणी प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पात बाधित होणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियातील त्याची पत्नी, मुले,भाऊ,बहीण,सून,नातू, नात,दत्तक मुलगा किंवा दत्तक मुलगी यांना नुकसान भरपाई अथवा पालिका सेवेत नोकरी देण्याबाबत धोरण राबविण्यात येत होते. मात्र आता राज्य शासनाच्या धर्तीवर हे धोरण आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यात कधी महत्त्वाची सुधारण करण्यात आली आहे. त्यावर आता मुंबई महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे.त्यानुसारच, यापुढे धरण प्रकल्पाच्या अंतर्गत बाधित व्यक्तीला अथवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अंतिम वारसदार म्हणून आता प्रकल्प बाधित व्यक्तीचा खापर पणतू, त्याची पत्नी किंवा खापर पणती यांनीही महापालिका सेवेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ही सुधारणा मुंबई पालिकेच्या हद्दीबाहेरील पाणीपुरवठ्यासारखे प्रकल्प आणि भातसा बुडीत प्रकल्प बाधितांसाठी करण्यात आली आहे. त्यांना नगरबाह्य प्रकल्पग्रस्त असे म्हटले जाते.