नाशिक
धोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संघटनेच्या सभासदांनी विविध भागात बेकायदेशीरपणे चाललेल्या एलडीओ विक्री केंद्रांना भेटी देऊन अवलोकन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. याची माहिती निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. बहुसंख्य एलडीओ विक्री केंद्र कृषी जमिनीवर कुठलीही अकृषिक परवानी न घेता व्यावसायिक विक्री करीत आहेत. एकाही केंद्राकडे खरेदीची देयके नाहीत. या केंद्रांवर तीन ते सहा हजार लिटरच्या प्लास्टिक टाकीत हलक्या डिझेल ऑइलची साठवणूक केली जाते. त्यासाठी विस्फोटक (एक्स्प्लोजिव्ह) विभागाची परवानगी घेतलेली नाही. विक्री करणाऱ्या केंद्रावर वाणिज्य वापरासाठी नाही, असे लिहिलेले आहे. वजनमाप विभागाकडून पडताळणी न करता राजरोस विक्री होत आहे. डिझेल वाहनात एलडीओ भरले जाते. कोणालाही देयक दिले जात नाही. पोलीस, तहसीलदार, तलाठी यापैकी कुणाचाही ना हरकत दाखला केंद्रांनी घेतलेला नसल्याचे पाहणीत उघड झाले. एलडीओ केवळ बॉयलर वा अन्य उष्णता संबंधित उपकरणात वापरले जाते. ही केंद्रे असणाऱ्या परिसरात कुठेही एलडीओ वापरण्यास परवानगी असल्याची साधने दिसत नाहीत. याठिकाणी विक्री होणारे एलडीओ नसून डिझेल असल्याची संघटनेची खात्री झाली असल्याचे संघटनेने म्हटले.