उल्हासनगर – ठाणे आणि मुंबई पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचार्यांनाही यंदा वाढीव दिवाळी बोनस मिळणार आहे.पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विकास ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रत्येक कर्मचाऱ्याला १७ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा निवृत्त झालेल्या ५८ कर्मचार्यांनाही या बोनस भेटीचा लाभ मिळणार आहे.
महापालिकेच्या या महत्वाच्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे तसेच कामगार आघाडीचे श्याम गायकवाड तसेच विविध संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.आयुक्त विकास ढाकणे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून या बोनसची अपेक्षा करणाऱ्या महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या कल्याणाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मागील वर्षी दिलेल्या १६ हजार ५०० रुपयांच्या बोनसमध्ये फक्त ५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे.तसेच या बोनसचा लाभ यंदा सेवानिवृत्त झालेल्या ५८ कर्मचार्यांनाही मिळणार आहे.पालिकेत सध्या एकूण कर्मचारी संख्या १ हजार ७१५ इतकी आहे.