सातारा- राज्यभरातील बैलगाडा शर्यतीची अनेक मैदाने मारणारा महाराष्ट्र चॅम्पियन सातारा तालुक्यातील बोरगावच्या गंध ग्रुपच्या ‘गंध’ या बैलाचे नुकतेच आजाराने निधन झाले.त्याच्यावर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
बैलगाडा शर्यतीना बंदी असतानाच्या काळात बिनजोड ‘गंध’ ने शर्यतीची ३० ते ३५ मैदाने सलग मारून तो महाराष्ट्र चॅम्पियन ठरला होता. महाराष्ट्रभरातील अनेक मैदाने जिंकणाऱ्या गंधच्या निधनाने बोरगाव परिसर तसेच महाराष्ट्रभरातील बैलगाडा शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
जनावरांच्या बाजारात कसबाच्या दावणीला चाललेले सहा महिन्याचे वासरु पाहून बोरगावच्या पांडुरंग साळुंखे यांना त्याची दया आली.कसाबाला पैसे देऊन त्यांनी त्याला घरी आणले.पोटाला भकाळी पडलेल्या त्या वासराला पप्पूशेठ बोरगावकर व अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कर्मचारी अमोल भोसले यांच्या देखभाली खाली गोंडस बनवले.सहा महिन्यातच वारूगत उधळलेल्या वासराचा गंध सर्वदूर पसरला.त्यानंतर त्याचे नाव ‘गंध’ आणि सांभाळ करणारे बैलगाडा शर्यतीवान ‘गंध ग्रुप बोरगाव ‘ म्हणून नावारूपाला आले.