पश्चिम बंगाल म्हटले की, अलीकडच्या राजकारणातील मार्क्सवादी नेते ज्योती बसू आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ही दोन नावे सहजी आठवतात. ममता बॅनर्जी आता 69 वर्षांच्या झाल्या आहेत, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अंगार कमी झालेला नाही. अनेकांना त्या आक्रस्ताळी, भांडखोर, उद्योगांना विरोध करणार्या, सतत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्या वाटतात. त्या लढवय्या आहेत, पण त्यांना आक्रस्ताळी किंवा भांडखोर म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय होईल. 34 वर्षे बंगालवर राज्य करणारी बलाढ्य कम्युनिस्ट सत्ता मुळापासून उपटून टाकायची आणि आता भाजपाचे तोडफोडीचे, ईडी, सीबीआयचे राजकारण एकट्याने मोडून काढत पाय रोवून पुन्हा पुन्हा सत्तेवर यायचे हे त्यांचे काम कुणा येर्यागबाळ्याचे काम नव्हे.
त्यांच्यात येडंगबाळं वाटते ते त्यांचे राहणीमान, पांढरी साडी, हवाई चप्पल, नीट न विंचरलेले केस, मुख्यमंत्री असूनही कोलकात्याच्या अत्यंत गर्दीच्या परिसरात एक खोलीच्या घरातच राहण्याचा त्यांचा हट्ट काहींना पटत नाही. पण त्यांची पांढरी साडी आणि निळी हवाई चप्पल पाहून त्यांचे कट्टर कार्यकर्ते स्वत:च्या घराला पांढरा आणि निळा रंग देतात ही ममता बॅनर्जींची ताकद आहे.
राजकारणाचा कीडा त्यांच्या मनात कॉलेजमध्येच शिरला. बारावीत असतानाच त्या काँग्रेसच्या छात्र भारती संघटनेच्या सदस्या बनल्या. तेव्हापासून 1998 साली स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष काढेपर्यंत त्या काँग्रेस पक्षातच राहिल्या. छात्र भारतीच्या आंदोलनात त्यांचा धडाडीचा सहभाग असायचा. जयप्रकाश नारायण यांच्या विरोधात घोषणा देत त्या त्यांच्या गाडीवर चढल्या आणि बॉनेटवर नाचल्या तेव्हा छायाचित्रकारांनी पटापट त्यांचे फोटो काढले. काँग्रेसच्या नरसिंह राव सरकारमध्ये त्यांना क्रीडा मंत्री केले, पण त्यांच्या सूचनांकडे मंत्रिमंडळ लक्ष देत नाही म्हणताना त्यांनी सरळ राजीनामा दिला आणि रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. तिथे त्यांचे मंत्रिपद गेले. 1991 साली त्या कम्युनिस्टांना भिडल्या तेव्हा हाजरा येथे त्यांना कार्यकर्त्यांनी घेरले आणि त्यांचे डोके फोडले. पण ममता बॅनर्जी घरी बसणार्या नव्हत्या. 1993 साली एका अत्याचार पीडित दिव्यांग मुलीला घेऊन त्या कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या लाल रंगाच्या रायटर्स बिल्डिंगमध्ये शिरल्या. त्यांना ज्योती बसूंपुढे कैफियत मांडायची होती. पण त्यांना हाताला धरून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या ममता बॅनर्जींनी शपथ घेतली की, आता मुख्यमंत्री बनूनच रायटर्स बिल्डिंगमध्ये येईन.
त्यानंतर काही वर्षांनी काँग्रेस सोडून त्यांनी स्वत:चा तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला. सुरुवातीला त्यांनी भाजपाशी युती केली. केंद्रात रेल्वेमंत्रीही झाल्या, पण भाजपाशी युतीमुळे त्या राज्यात हरल्या, पालिकेत हरल्या. अखेर त्यांनी भाजपाची साथ सोडली. त्याचवेळी शेतकर्यांची जमीन बळजबरीने घेऊन कारखाना उभा करण्याच्या टाटा समूहाच्या निर्णयाविरोधात सिंगूर येथे आंदोलन सुरू झाले. हे अत्यंत दीर्घकाळ चालले. आंदोलनाने अनेकदा हिंसक वळण घेतले. ममता बॅनर्जी शेतकर्यांच्या बाजूनी मैदानात उतरल्या. त्यांनी 26 दिवस उपोषणही केले. अखेर शेतकरी विजयी झाले. ममता बॅनर्जी स्टार झाल्या आणि जनतेच्या पूर्ण पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्या. आजही भाजपा आणि कम्युनिस्टांविरुद्ध त्या ‘खेला होबे’ म्हणत लढत आहेत.