कोलकाता- बांगलादेशचे
पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी विशेष परवानगी दिल्यानंतर भारतात हिल्सा माशाचे ट्रक येऊ लागले आहेत.दुर्गा पूजेदरम्यान भारत एकूण २४२० टन हिल्सा मासा बांगलादेशातून आयात करणार असून ५० टनाची पहिली खेप नुकतीच कोलकाता शहरात दाखल झाली आहे.
बंगाली संस्कृतीत हिल्सा माशाला एक आगळेवेगळे स्थान आहे.पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेदरम्यान हिल्सा जातीचा मासा खाणे शुभ मानले जाते.हिल्सा मासा हा त्याची वेगळी चव आणि रेशमी पोत यामुळे बहुमोल मानला जातो. या माशाची उत्पत्ती गोड्या पाण्यात होते.हिल्साला पश्चिम बंगाल राज्याचा ‘राज्य मासा’ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा मानला जातो. बांगलादेशमध्ये जगातील ७० टक्के हिल्सा माशाची पैदास होते.त्यामुळे सणासुदीच्या काळात हिल्सा माशाची प्रचंड मागणी होत असल्याने बांगलादेशवर निर्भर रहावे लागते.परंतु हिल्सा माशाची देशांतर्गत वाढती मागणी पाहता बांगलादेश सरकारने जुलै २०१२ मध्ये हिल्साच्या निर्यातीवर बंदी घातली होती.परंतु २०१९ सालापासून बांगलादेश सरकार फक्त दुर्गा पूजेदरम्यान भारतात हिल्सा मासे निर्यात करण्याची विशेष परवानगी देत असते. त्याप्रमाणे यंदा २४२० टन हिल्सा माशांची बांगलादेशातून भारतात आयात केली जाणार आहे.