रेक्यविक
आईसलँडच्या एका दुर्गम गावात पांढऱ्या अस्वलाचे दर्शन झाले असून गेल्या ८ वर्षात हा दुर्मिळ पोलर बिअर पहिल्यांदाच दिसला आहे. पांढऱ्या अस्वलापासून धोका असल्याचा संशय आल्याने वेस्टफोर्ज्डच्या पोलीसांनी त्याला ठार केले.
आईसलँडच्या एका घराजवळ हे अस्वल एका महिलेला दिसले. तिच्या कचऱ्याच्या डब्याजवळ त्याची हालचाल दिसल्यानंतर भीतीने तिने स्वतःला वरच्या मजल्यावर कोंडून घेतले. तिने आपल्या मुलीला फोन करुन ही माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पांढऱ्या अस्वलापासून धोका असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी या अस्वलाला गोळी घातली. आम्ही हे करायला नको होते अशी प्रतिक्रिया नंतर पोलिसांनी दिली. पर्यावरण तज्ज्ञांनी या बाबत म्हटले आहे की, पांढरे अस्वल आईसलँडमध्ये आढळत नाहीत. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे ग्रीनलँडमधील बर्फ वितळू लागल्यामुळे ही पांढरी अस्वले अन्नाच्या शोधात इथे येत असतात. पांढऱ्या अस्वलाचे माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र तो क्रुर असल्याच्या अनेक दंतकथांमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.