कीव्ह – युक्रेनने सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण क्षेत्रातील अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांना टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप वापरण्यास बंदी घातली आहे. सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना टेलिग्राम हे अॅप सरकारी कामकाजासाठी असलेल्या मोबाइलमध्ये वापरण्यास बंदी केली आहे.
रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे युक्रेनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेशन सेंटरने सांगितले. युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षण परिषदेने फेसबुकवर दिलेल्या निवेदनात ही बंदी जाहीर केली.सायबर हल्ला,फिशिंग,मालवेअर पसरवणे,वापरकर्त्याची ठिकाणे स्थापित करणे आणि क्षेपणास्त्र स्ट्राइक कॅलिब्रेट करण्यासाठी टेलिग्राम सक्रियपणे रशियाद्वारे वापरले जाते.हा टेलिग्राम बंदीचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना मात्र लागू नसेल. युक्रेनमध्ये केवळ मजकूर पाठवण्यासाठीच नव्हे तर रशियन हवाई हल्ल्यांच्या बातम्या वाचण्यासाठी देखील या अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.अध्यक्ष झेलेन्स्की हेसुद्धा जनतेशी संवाद साधण्यासाठी या अॅपचा सर्रास वापर करतात.