*’इस्रो’च्या प्रमुखांची माहिती
नवी दिल्ली- इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी आज चांद्रयान-४ आणि गगनयान भारतीय अंतराळ मोहिमांबाबत महत्त्वाची माहिती दिली. सोमनाथ म्हणाले की,चांद्रयान-४ मोहिमेला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाले आहे.त्यालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. चांद्रयान-४ या उपग्रहाचा आकार चांद्रयान- ३ पेक्षा दुप्पट असणार आहे. तर गगनयान मोहीमही वर्षभरात सुरू केली जाणार आहे.
डॉ.एस.सोमनाथ म्हणाले की, अंतराळ कार्यक्रमाला चालना देण्यासाठी, चंद्राचे खडक पृथ्वीवर परत आणण्यासाठी, शुक्र ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान पाठवण्यासाठी, भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी चांद्रयान-४ मोहिमेला सरकारने मान्यता दिली आहे. चांद्रयान-४ चंद्रावर जाईल आणि तिथे सॉफ्ट लँडिंग करेल. मिशन पूर्ण केल्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. मात्र त्याचे पृथ्वीवर परतणे हे पूर्णपणे वेगळे मिशन आहे. चांद्रयान-३ फक्त चंद्रावर गेले आणि तिथे सॉफ्ट लँडिंग केले होते.मात्र चांद्रयान-४ चंद्राच्या पृष्ठभागावरून ३ ते ५ किलो माती आणि खडकाचे नमुने पृथ्वीवर घेऊन येणार आहे.या उपग्रहाचा आकार चांद्रयान-३ पेक्षा दुप्पट असणार आहे. त्यामध्ये पाच मॉड्यूलदेखील आहेत. तसेच चांद्रयान-४ दोनदा प्रक्षेपित केले जाणार आहे. विशेष म्हणजे, गगनयान मिशनही प्रक्षेपणासाठी तयार करण्यात आले आहे, या वर्षभरात ते सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.