बहराईच
उत्तर प्रदेशातील बहराईच भागात काल मध्यरात्री पुन्हा एकदा लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एक ६ वर्षाचा मुलगा व ५५ वर्षीय व्यक्ती जखमी झाले आहेत. अंगणात झोपलेल्या एका ६ वर्षांच्या मुलावर लांडग्याने हल्ला केला. लांडगा त्याला ओढून नेत असताना त्याच्या वडिलांनी त्याला वाचवले. दूसऱ्या एका हल्ल्यात एक ५५ वर्षीय व्यक्तीही लांडग्याच्या हल्ल्यात जखमी झाला.बहराईच भागातील हरदी गावातील ६ वर्षाचा पारस हा मुलगा व्हरांड्यात झोपला होता. त्यावेळी मध्यरात्री अडीच वाजता लांडग्याने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याच्या आईने आरडाओरडा केला. मुलाचे वडील गुरीया यांनी लांडग्याकडे धाव घेत आपल्या मुलाला त्याच्या तावडीतून वाचवले. अशाच प्रकारे दरहिया गावातील ५५ वर्षीय कुन्नु लाल यांच्यावरही लांडग्याने हल्ला केला. लांडग्याबरोबर त्यांची झटापट झाली. गावकऱ्यांचा आवाज आल्यानंतर लांडगा पळून गेला. या दोघांवरही जवळच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरु आहेत.बहराईच भागात लांडग्यांच्या हल्ल्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात बहुतांशी लहान मुले होती. त्यानंतर वनविभाग व पोलिसांनी लांडग्यांना जेरबंद करण्यासाठी संयुक्त कारवाईही केली होती. त्यावेळी दोन लांडग्यांना जेरबंद करण्यात आले. त्यानंतर काही दिवस हे हल्ले झाले नव्हते. मात्र काल मध्यरात्री लांडग्यांनी पुन्हा गावकऱ्यांवर हल्ले केले. लांडग्यांपासून बचाव करण्यासाठी या भागात १५० सशस्त्र पोलीस व वनविभागाचे २५ जवान तैनात करण्यात आले आहेत.