मुंबई -पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या दरम्यान द्विसाप्ताहिक नियमित एक्स्प्रेस सुरू केली आहे. आज, गुरुवारी बोरिवलीहून मडगावसाठीची उद्घाटनाची ही विशेष एक्स्प्रेस दुपारी दीड वाजता रवाना झाली.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बोरिवली येथून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोघांनी गणपती उत्सवासाठी अशीच एक गाडी सुरू करण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला मेमू ट्रेन (इंटरसिटी लोकल ट्रेन) चालवण्याची ही योजना होती, जी नंतर मागे घेण्यात आली. आता नियमित सेवा म्हणून वांद्रे टर्मिनस येथून मडगावपर्यंत आठवड्यातून दोन वेळा ही २० डब्यांची ही गाडी धावणार आहे.
वांद्रे टर्मिनस आणि मडगाव येथून सुटणाऱ्या या गाडीला बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी आदि १३ थांबे असतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की गाडी १४ तास ३५ मिनिटात मडगावला पोहोचणार आहे. गाडीचा सरासरी वेग ४२ किमी प्रति तास असेल आणि ६०४ किमीचा प्रवास करेल.