कोठडीतील बदलापूरच्या आंदोलकांची कहाणी

बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब उघड्यावर आली.
नीलेश पाचारणे हे ओला टॅक्सी चालवतात. ज्या दिवशी आंदोलन झाले तेव्हा ते बदलापूर पूर्वेला स्टेशनजवळ होते. कसले आंदोलन सुरू आहे म्हणून ते बघायला गेले. पत्नी अमृताला 10 मिनिटात घरी येतो असे फोन करून सांगितले आणि आंदोलन बघायला गेले. पत्नी अमृता सांगतात की, 10 मिनिटांत घरी येतो म्हणालेले हे अजून कसे आले नाहीत म्हणून मी सतत फोन करत होते. पहाटे 4 वाजता मला यांचा फोन आला. माझ्यातर पायाखालची जमीन सरकली. मला 10 वर्षांची दोन छोटी मुले आहेत. घरात कमवणारे हे एकटेच आहेत. आम्ही रोज कमवतो आणि खातो. आता 4 दिवस घरात काही नाही, मुलांना डाळ भात खायला घालून मी मदतीसाठी फिरते आहे. आज सासूकडून थोडे पैसे आणले. मी शिकलेली नसल्याने काही कामधंदा करू शकत नाही. 30 ऑगस्टला लाईट बिल भरायचे आहे.
1 सप्टेंबरला खोलीचे भाडे द्यायचे आहे. इथे रोजसाठीच पैसे नाहीत. त्यात ह्या जेलमधून त्या जेलसमोर जाऊन उभे राहावे लागते. आमचे मरण आम्हाला माहिती. पोलीस 3-3तास बाहेर उभे करतात. आज आधारवाडी जेलमध्ये ह्यांना भेटले. कोणीतरी ड्रायव्हर बघून गाडी भाड्याने दे म्हणाले, पण मी तर कोणालाच ओळखत नाही. ‘कुत्रे हाल खात नाही’ अशी स्थिती झाली आहे.
आंदोलनाच्या वेळी आपल्या भावाला बरोबर घेऊन गेलेली अर्चना म्हणते, मी स्टेशनवरून येत होते. माझा भाऊ बरोबर होता आणि आंदोलनाचे कारण कळल्यावर माझ्यातील आईने तिथे थांबायला भाग पाडले. माझी घरात 6 वर्षांची मुलगी आहे. मी कामावर जाते. मुलीची आठवण आली आणि आम्ही थांबलो, पण आता वाटते थांबलो ही चूक झाली. कारण घरात कमवणारे आम्ही दोघेच. त्यातच माझा भाऊ सध्या बेरोजगार आहे, पण त्या दिवशी त्याला अटक झाल्यापासून आता आम्हाला कोणी मदत करायला आले नाही. भावावर तर अशी कलमे लावली आहेत की, आता त्याला कोणी नोकरी देणार नाही. मी सतत वणवण फिरते. जामिनासाठी पैसा नाही. आता तर आंदोलनाची बदनामी सुरू झाली आहे.
बदलापूर स्टेशनच्या समोर केसर स्वीट्स या दुकानाचे मालक बघेल म्हणाले, आमच्या दुकानाच्या वर एक खोली आहे. त्यात माझा भाऊ, भाचा, वडील, मेहुणा असे 6 जण झोपले होते. पोलीस आत खोलीत घुसले आणि ह्या सगळ्यांना पकडून घेऊन गेले. आमचे खरेतर काही देणेघेणेच नव्हते, पण पोलिसांनी जबरदस्ती घुसून कारवाई केली. सगळे कल्याणला आधारवाडी जेलमध्ये आहेत. आम्हाला भेटू दिले जात नाही.
भावेश म्हसे हा रिक्षा ड्रायव्हर बदलापूरला गणेश चौकात राहतो. त्याची बहीण पल्लवी कदमचा आरोप आहे की, पोलिसांनी कोठडीत भावेशला खूप मारले. पायातून रक्त येईपर्यंत मारले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. नंतर त्याला चोपडा कोर्टात आणले तेव्हा त्याची अवस्था वाईट होती. तो हातावर पोट असणारा माणूस, कशाला आंदोलनात जाईल? पण आमचा कोणी वालीच नाही.
या निरापराधांना सोडवण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर, कल्याण येथील वकिलांनी विनामूल्य सेवा देण्याचे जाहीर करून वकिलांची मोठी फौज उभारली आहे. या वकिलांशी बोलताना एक जाणवले की जवळजवळ प्रत्येकाच्या घरात एक मुलगी होती, एक बहीण होती आणि आई होती.
वकील पंकज अटकळे यांच्याशी बोलताना त्यांच्याही स्वरात कर्तव्याची जाण जाणवली. ते म्हणाले की, बदलापूर येथे ज्या दोन चिमुकल्या निष्पाप मुलींवर जो अत्याचार झाला त्याचे पडसाद 20 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे उमटले. आंदोलनानंतर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्या रात्रीपासून आंदोलनात सामील असलेल्या सर्वसाधारण लोकांची धरपकड चालू केली. त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. त्यातली बरीच मंडळी ही साधारण घरातील असून, त्यांच्यावर त्यांच्या घरातील उदरनिर्वाह चालतो. काही लोक हे हात मजुरी करतात आणि त्यांच्या दिवसाच्या रोजगारावर त्यांच्या कुटुंबाचे एक वेळचे जेवण चालते. सदर घटना घडल्यावर माझ्या असे निदर्शनास आले की, आरोपी ठरवलेल्या काहींचे आईवडील हे वृद्ध असून, त्यांच्यावर अवलंबून आहेत. काही आरोपींची लहान मुले व पत्नी सदर घटना घडल्यानंतर आक्रोश करताना कोर्टाच्या बाहेर दिसतात. त्या लहान केविलवाण्या मुलांचे चेहरे बघितल्यानंतर खरंच मनात दुःख तसेच संबंधित सरकारविरुद्ध राग निर्माण होत होता. सदर शासनाचे अटकसत्र हे चालूच होते. त्यांनी उल्हासनगर कोर्टामध्ये 28 आरोपींना पकडून आणले होते व त्यांचे जामीन करणे हे महत्त्वाचे होते. रेल्वेच्या बाहेर पकडलेल्या आरोपींविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. परंतु त्यात जामीन देण्याचा अधिकार हा प्रथम न्याय दंडाधिकारी यांना असल्यामुळे त्या आरोपीचे जामीन शुक्रवारी झाले. रेल्वे कोर्टात अगोदर 22 ऑक्टोबर व आज रोजी 9 आरोपींना पकडून आणले होते. आता जे अटक आरोपी आहेत यांच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद केलेली आहे. तसेच सदर गुन्ह्यामध्ये काही कलम हे अजामीनपात्र असून, सत्र न्यायालयाला सदर गुन्ह्यामध्ये जामीन देण्याचा अधिकार आहे. सदर सरकारने आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 121, 121(1), 132,189,190, भा.रे. ॲक्ट 37, म. हा. पोलीस 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.
असे जवळपास 300 नागरिक या आंदोलनामुळे अचानक आंदोलनकर्ते ठरवले गेलेल्या नागरिकांचा गुन्हा फक्त एवढाच होता की, ते या शहरातले नागरिक होते. तो त्यांचा नेहमीचा येण्या जाण्याचा रस्ता होता. त्यादिवशी याच रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होते आणि ते अडकून पडले. मात्र हे अडकणे आता त्यांच्या जीवावर बेतले आहे. कारण काहीही संबंध नसताना प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांना केवळ सदर ठिकाणी आढळून आले अथवा उपस्थित होते असे आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या अनाहूतपणे झालेल्या कारवाईने अनेकांच्या कारकिर्दीला तडा जाणार आहे. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आयुष्यभरासाठी अपराधाचा शिक्का कपाळावर बसला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top