नवी दिल्ली – बांगलादेशात आलेल्या पुराला भारत जबाबदार नाही असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. त्रिपुरातील डांबूर धरण उघडल्यामुळे पूर आल्याची अफवा बांगलादेशात आहे. मात्र हे खरे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बांगलादेशातील १२ जिल्ह्यांमध्ये भीषण पूर आला असून दक्षिण-पूर्व बांगलादेशमधील तब्ब्ल ३६ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. शेकडो घरे पाण्यात बुडाली असून लोक छतावर अडकले आहेत. स्थानिक माध्यमांच्या माहितीप्रमाणे पूर आणि पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसह अंतरिम सरकारमधील काही नेत्यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे. बीएनपी पक्षाचे संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आरोप केला की, भारताने डांबूर धरणाचे दरवाजे जाणूनबुजून उघडल्याने भीषण पूर आला. भारताला बांगलादेशातील लोकांची पर्वा नाही.
बांगलादेश सरकार आणि नागरिकांकडून करण्यात आलेल्या आरोपावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे की, भारत आणि बांगलादेशमधून गोमती नदी वाहते. नदीच्या आसपासच्या भागात यावर्षी सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील नद्यांना पूर येणे ही एक सामान्य समस्या आहे, या समस्येशी दोन्ही देशातील लोकांना संघर्ष करावा लागतो. बांगलादेश सीमेपासून डांबूर धरण १२० किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. हे सुमारे ३० मीटरचे धरण आहे. या धरणातून वीज निर्मिती केली जाते. त्यातील ४० मेगावॅट वीज ग्रीडच्या माध्यमातून त्रिपुरामार्गे बांगलादेशला मिळते. या धरणातील पाणी सोडण्यात आलेले नाही .