मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने एनआयएला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेर जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली गाडी सोडण्यात आल्या प्रकरणी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्यासह विनायक शिंदे व इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मात्र या अटकेलाच आव्हान देत सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. वाझे यांच्यावतीने अॅड.आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला.त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आपल्या अशिलावर युएपीए कायद्यांतर्गत चुकीची कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाने याचिकेचे अवलोकन केल्यानंतर वाझे यांच्या वकिलांना विचारले की,ही याचिका आहे की लेखक ऑस्कर वाइल्डचा पीएचडीसाठी असलेला ग्रंथ आहे ? त्यावर अॅड.पोंडा म्हणाले की,तळोजा कारागृहात असताना त्यांनी याचिकेचा मसुदा तयार केला असून त्यासाठी त्यांनी १४ ते १६ तास अभ्यास केला आहे. यावर आता न्यायालयाने एनआयला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २३ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.