मुंबई- भारतीय उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी अजूनही आर्थिक संकटात आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यातीलच नागपूरमधील विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड ही कंपनी आता उद्योगपती गौतम अदानी विकत घेणार असून तशा हालचाली सुरू केल्या आहेत.
नागपूरच्या बुटीबोरी येथील ६०० मेगावॉटचा अनिल अंबानी याचा हा सौरउर्जा प्रकल्प अदानी पॉवर अंदाजे ३ हजार कोटी रुपयांत खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे.मात्र दोघांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. अदानी समूह हा सीएफएम अॅसेट रिकंस्ट्रक्शन या कंपनीशी चर्चा करत आहे. कारण ही कंपनी अनिल अंबानी यांच्या कंपनीची विक्रीची प्रक्रिया राबविणार आहे. या खरेदी व्यवहाराचे मूल्य प्रति मेगावॉट ४ ते ५ कोटी रुपये असल्याचा अंदाज अर्थ विश्लेषक व्यक्त करत आहेत. या व्यवहाराच्या चर्चेमुळे अदानी समुहाच्या संबंधित व्यवसायातील कंपन्यांचे शेअरचे भाव वधारले होते.