मुंबई- आम आदमी पक्ष मुंबईतील विधानसभेच्या सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे,अशी माहिती आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी दिली.
प्रिती मेनन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की,‘ राज्यातील खोके सरकारकडे लोककल्याणकारी कामासाठी वेळ नाही. राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्यात सरकार व्यस्त आहे. खोके सरकारकडे लोकहितासाठी शून्य राजकीय इच्छाशक्ती आहे आणि त्याऐवजी ते केवळ भ्रष्टाचारातच व्यस्त आहेत. कारण त्यांना खात्री आहे की ते सत्तेत पुन्हा येणार नाहीत.एकनाथ शिंदे सरकार हे राज्याच्या तिजोरीची एकत्रितपणे लूट करण्याशिवाय दुसरे काही करत नाही.सध्याच्या भाजप-शिंदे सेनेच्या नेतृत्वाखालील बेरोजगारी आणि महागाईने आम आदमीचे कंबरडे मोडले आहे. कृषी संकट आणि संबंधित शेतकरी आत्महत्या सुरू आहेत.आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचप्रमाणे यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्याध्यक्ष रुबेन मस्कारेन्हास यांनी सांगितले की,”आम आदमी पक्ष हा केवळ पर्याय नाही तर उपाय आहे.हे राज्यातील जनता जाणून आहे. हा पक्ष सामाजिक परिवर्तनासाठी सर्वांत सक्षम म्हणुन उदयास आला आहे.आम्ही महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून नक्की सोडवू.”