बांगलादेशात अराजक! शेख हसीनांनी देश सोडला भारतातून लंडनला जाणार? देशभरात हिंसाचार! लष्कराचा ताबा?

ढाका – बांगलादेशात सरकारी नोकरीतील आरक्षणावरून उसळलेल्या आंदोलनाने आज उग्र रूप धारण केले! देशात अराजक माजले! आंदोलकांनी रस्त्यावर उतरून थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसून तोडफोड आणि लुटमार केली. स्थिती हाताबाहेर गेलेली पाहून पंतप्रधान शेख हसीना व त्यांची बहीण यांनी लष्कराच्या विमानात बसून देश सोडला आणि भारत गाठला. तिकडे बांगलादेश लष्कराने प्रशासनाचा ताबा घेण्याची पावले टाकली. दरम्यान, बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान खलीदा जिया यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. तर बांगलादेशमधील परिस्थितीनंतर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक
घेऊन चर्चा केली.
शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत बांगलादेशातील आंदोलक संचारबंदी असूनही आज सकाळपासून राजधानी ढाका येथे लाँग मार्चसाठी जमले होते. कुठल्याही परिस्थितीत लाँग मार्च काढण्यावर ते ठाम होते. पोलिसांबरोबर त्यांच्या झटापटी सुरू होत्या. आंदोलकांनी एक पोलीस ठाणेही जाळले. त्यामुळे परिस्थिती स्फोटक होत चालली होती. त्यानंतर लष्कराने सूत्र आपल्या हातात घेतली. बांगलादेश लष्कराचे प्रमुख वेकर उझ झमान यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत हसीना यांना जनतेच्या भावनांचा विचार करून सत्तेतून बाहेर होण्याचा सल्ला दिला. लष्कराने हसीना यांना राजीनामा देण्यास फक्त 45 मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानंतर हसीना यांनी काही मिनिटांत घाईघाईत राजीनामा दिला. त्यांना जनतेला उद्देशून शेवटचा संदेशही रेकॉर्ड करता आला नाही, असे सांगितले जात आहे. बांगलादेश मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हसीना लष्कराच्या विमानाने दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास बंगभवन या त्यांच्या निवासस्थानाहून त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्यासोबत सुरक्षित ठिकाणी निघाल्या. त्यांचे विमान संध्याकाळी सहा वाजता गाझियाबादच्या वायुदलाच्या हिंडेन विमानतळावर लँड झाले. त्यावेळी तिथे भारतीय हवाई दलाचे अधिकारीही
उपस्थित होते. शेख हसीना यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरताच लाखो बांगलादेशी रस्त्यावर उतरले. त्यांनी जाळपोळ आणि मोडतोडीला सुरुवात केली. ढाका येथील बंगबंधू मुजीबूर रहेमान यांच्या पुतळ्याची हातोड्याने मोडतोड करण्यात आली. काही आंदोलकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह काही कार्यालये आणि आस्थापनांवरही हल्ले केले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. काही काही आंदोलकांनी संसदेच्या इमारतीत घुसून हुल्‍लडबाजी केली. ढाक्यामध्ये रस्त्यावर चिलखती वाहने तैनात होती. तसेच हसीना यांच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या मार्गांवर काटेरी ताराही लावल्या होत्या. परंतु आंदोलकांनी हे सर्व अडथळे तोडून टाकले. काही आंदोलक पंतप्रधानांच्या बंगभवन निवासस्थाना घुसले. तिथे त्यांनी तोडफोड केली. तसेच किचनमधील मटण, भात इतर खाद्यपदार्थांवर ताव मारला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचताच अनेक आंदोलक थेट शयनकक्षात गेले. पंतप्रधानांच्या निवासस्थानातील मौल्यवान वस्तू, चादरी आणि उशासुद्धा पळवल्या. तिथे त्यांनी सेल्फी काढले. काहींनी निवासस्थानातील पक्षी, ससे हातात घेऊन सेल्फी काढले. काहींनी या निवासस्थानातील महागड्या वस्तूंची मोडतोड केली. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत राजकीय अराजक निर्माण झाले होते, तेव्हाची आठवण करून देणारी दृश्ये बांगलादेशात दिसत होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमन यांनी आधी बांगलादेशमधील सर्व राजकीय पक्ष, संघटना व पदाधिकार्‍यांशी आणि नंतर देशवासीयांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, देशात कर्फ्यू किंवा आणीबाणी लागू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आम्ही आज रात्रीपर्यंत तोडगा काढू. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लष्कर अंतरिम सरकार स्थापन करेल. देशभरात उसळलेल्या हिंसाचाराची पूर्ण जबाबदारी लष्करप्रमुख म्हणून मी घेत आहे. देशभरात गेल्या काही आठवड्यांमध्ये झालेल्या हत्यांची लष्कर चौकशी करेल. माझे आंदोलकांना आवाहन आहे की, त्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे.
दरम्यान, बांगलादेशातील या परिस्थितीचा भारतावर काही परिणाम होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींनी सुरक्षा समितीची बैठक बोलावून त्यात संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री जयशंकर तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोबाल व संबंधित खात्याचे सचिव उपस्थित होते. तत्पूर्वी डोबाल यांनी हेडन बेसवर जाऊन शेख हसीना यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि या
चर्चेची माहिती नंतर पंतप्रधानांना दिली. शेख हसीना रात्री उशिरापर्यंत दिल्लीत थांबल्या होत्या. बांगलादेशात गेल्या महिनाभरापासून सरकारी नोकर्‍यांतील आरक्षणावरून देशव्यापी आंदोलन धुमसत आहे. बांगलादेशात सरकारी नोकर्‍यांत 56 टक्के आरक्षण असून, त्यातील 30 टक्के आरक्षण 1971 च्या मुक्तिसंग्रामात सहभागी असलेल्या त्यांच्या वारसांना 1972 मध्येच देण्यात आले होते. ते 2018 मध्ये न्यायालयाने रद्दबातल केले होते. मात्र हे आरक्षण यावर्षी 5 जून रोजी उच्च न्यायालयाने पुन्हा बहाल केले. यावरून तरुणांमध्ये असंतोष होता. 30 टक्के आरक्षण मुक्तिसंग्रामातील वारसांना दिल्यामुळे इतर गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होतो, असे आंदोलकांचे म्हणणे होते. त्यावरून उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 300 आंदोलकांचा मृत्यू झाला. अखेरीस बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने मुक्‍ति संग्रामातील सहभागींच्या वारसांचे आरक्षण कमी करून ते फक्‍त 5 टक्क्यांवर आणले. इतर वर्गाला 2 टक्के आरक्षण ठेवून 93 टक्के आरक्षण खुल्या वर्गाला दिले. मात्र त्यानंतरही हे आंदोलन सुरूच राहिले होते. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली होती. त्यातून आज शेख हसीना यांना राजीनामा द्यावा अशी नवी मागणी केली. गेले दोन दिवस हे आंदोलन आणखी चिघळले होते. त्यातून शेख हसिना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. दरम्यान, शेजारी देशात चाललेल्या या घडामोडी भारतासाठी महत्त्वाच्या असल्याने भारत सरकार त्यावर नजर ठेवून असल्याचे भारत
सरकारने सांगितले.

हिंदूंच्या मंदिरांना टार्गेट
दोन नेत्यांची हत्या

बांगलादेशमध्ये सुरू झालेल्या हिंसक उद्रेकात हिंदुंच्या मंदिरांना
टार्गेट करण्यात आले. इस्कॉन आणि कालिमाता मंदिरावर हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर शेख हसिना यांच्या पक्षातील दोन कौन्सिलरची हत्या करण्यात आली. शेख हसिना यांच्या पक्षातील नेत्यांच्या घरावर आणि मालमत्तांवर हल्ले करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top