हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या शिवाय अजून एका व्यक्तीची चौकशी सुरु आहे जर त्याचा गुन्ह्यात समावेश असेल तर त्याला देखील अटक केली जाईल, असे पोलीस विभागाने सांगितले.
हिंगोलीमधील अनुराधा पतसंस्थेच्या संचालक मंडळाने तसेच कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना १० ते १२ टक्के व्याज परतावा देण्याचे आमिष दाखवले व त्यांच्याकडे ठेवी घेतल्या होत्या. मात्र ठेवीदारांनी ठेवीची मुदत संपल्यानंतर रक्कमेची मागणी केल्यानंतर पतसंस्थेकडून टाळाटाळ केली होती. त्यामुळे ठेवीदारांना आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारी नंतर पतसंस्थेचे लेखा परीक्षण केले होते. या परीक्षणात पतसंस्थेच्या ४०३८ ठेवीदारांची ६.२६ कोटी रुपयांची फसवणूक झाली हे स्पष्ट झाले होते, यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी आशा ११ जणांवर २३ मे २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता, नंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
या प्रकरणातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सदर केला होता. मात्र तो फेटाळला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी ठेवीदारांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. त्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना अटक करण्यात आली, या शिवाय अन्य एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सदर व्यक्तीचे गुन्ह्यात नाव नसले तरी त्याची चौकशी सुरु केली. या प्रकरणात त्या व्यक्तीचा समावेश असेल तर त्यालाही अटक केली जाईल, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागाने सांगितले.