अदीस अबाबा – दक्षिण इथिओपियातील दुर्गम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून यात किमान १५७ जण ठार झाले आहेत. याच ठिकाणी आदल्याच दिवशी देखील भूस्खलन झाले होते. मदत आणि बचावासाठी गेलेले लोक दुसऱ्या दिवशी झालेल्या भूस्खलनात गाडले गेल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
इथिओपियाच्या दक्षिणेकडील केंचो शांचा गोझदी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात ५५ ठार झाले होते.त्यानंतर काल पुन्हा झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या वाढून १५७ झाली.चिखलाच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्यांमध्ये लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध देखील आहेत.चिखलातून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. आणखी अनेक जण चिखलाखाली गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. डोंगरउतारावरील अनेक घरे देखील चिखलाखाली पूर्ण गाडली गेली आहेत. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते, असे आपत्ती प्रतिसाद दलाने म्हटले आहे. इथिओपियात पावसाळ्यात भूस्खलन होणे ही सामान्य घटना आहे.हा पाऊस जुलैमध्ये सुरू झाला असून तो सप्टेंबरच्या मध्यापर्यंत राहील अशी शक्यता आहे.