मुंबई – उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, मी त्यांच्या हिताबद्दलच बोलत असतो, असेही शंकराचार्य म्हणाले.
ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की सगळ्यात मोठा घात हा विश्वास घात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला याची पीडा अनेकांना आहे. कोणाचे हिंदुत्व खरे हे समजून घ्यावे लागेल. मात्र जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे. जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.
पुराणात बारा ज्योतिर्लिंग असतात असे सांगितले आहे. जिथे त्यांचे ठिकाण आहे तिथेच मंदिर उभारले पाहिजे. केदारनाथ म्हणजे केदार हा हिमालयाच्या पृष्ठभागावर आहे. केदार जर हिमालयात आहे तर तुम्ही त्याला दिल्लीत का आणता असा प्रश्न अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला. केदारनाथ दिल्लीत उभारणे ही चेष्टा आहे. धर्मस्थानात राजकारणातील लोक प्रवेश करत आहेत. केदारनाथ मध्ये २८८ किलो सोन्याचा घोटाळा झाला. आता दिल्लीत केदारनाथ उभारणार म्हणजे तिथे सुद्धा घोटाळा करणार का, असा सवाल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला.