मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मध्यरात्री चार तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर,तर हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.या मेगाब्लॉकमुळे मेल- एक्स्प्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी १०.५० वाजल्यापासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.या ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी येथून डाऊन जलद/अप जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.त्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.तर हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११. १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.तर सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा धावणार आहे.
दरम्यान,पश्चिम रेल्वे मार्गावर आज शनिवारी आणि उद्या रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजल्यापासून ते पहाटे ४.१५ वाजेपर्यत मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप- डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल सेवा सांताक्रूझ ते चर्चगेट रेल्वे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.